सर्वत्र भगवे झेंडे, शिवाजी महाराजांची मूर्ती व त्यांचे छायाचित्र असलेले झेंडे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. शिवरायांची मूर्ती व झेंडे यांना मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.शिवजयंतीची तयारी गेल्या आठवडाभरापासून सुरू झाली आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक ठिकाणी शिवचरित्र पारायण, कीर्तन, शाहिरी व इतर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. तसेच बाजारात झेंडे, मूर्ती व अन्य वस्तूंची रेलचेल दिसत आहे. औरंगपुरा, पैठणगेट, शिवाजीनगर, उस्मानपुरा, टीव्ही सेंटर, बसस्थानक परिसर, उस्मानपुरा, मुकुंदवाडी, सेव्हन हिल आदी परिसरात झेंडे विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. झेंडे घेण्यासाठी तसेच शिवाजी महाराजांच्या मूर्ती घेण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. ऑफिसमध्ये, घरात, शोकेसमध्ये ठेवण्यासाठी टेबल स्टँड झेंडे खरेदीला शिवप्रेमी नागरिक पसंती देत आहेत. घरामध्ये तसेच कार्यालयात भिंतीवर लावण्यासाठी शिवाजी महाराजांच्या फोटो फ्रेम मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. लहान आकारापासून ते मोठ्या आकारापर्यंत नागरिक फोटो फ्रेम खरेदीला प्राधान्य देत आहेत.